बुलढाणा : जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात अधिकृत युती जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांमध्ये ५०-५० टक्के जागावाटप निश्चित झाले असून, या आधारे नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
युतीच्या जागावाटपानुसार वंचित बहुजन आघाडी बुलढाणा घाटावरील बुलढाणा, सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि लोणार तसेच घाटाखालील खामगाव, शेगाव आणि जळगाव जामोद या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लढवणार आहे.
वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व उमेदवार, संघटनात्मक तयारी, प्रचार आराखडा आणि कार्यकर्त्यांचे नियोजन पूर्ण केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा प्रभारी प्रदीप वानखेडे यांनी सांगितले.
या युतीमुळे जिल्ह्यात मजबूत पर्याय उभा राहील आणि दोन्ही पक्षांना चांगले यश मिळेल, असा विश्वासही वानखेडे यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची ही युती जिल्ह्यात चांगले यश संपादन करेल, याची मला पूर्ण खात्री आहे.”
स्थानिक राजकारणात ही युती मोठी घडामोड मानली जात असून आगामी निवडणुकांमध्ये या आघाडीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






