मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज, मंगळवारी दुपारी ४ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत पहिल्या टप्प्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
निवडणुका जाहीर होताच राज्यात आचारसंहिता तत्काळ लागू होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासारख्या रखडलेल्या मुद्द्यांवरून निवडणुका थांबल्या होत्या. मात्र, ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असल्याने, निवडणूक आयोगावर तातडीने निर्णय घेण्याचे बंधन आहे.






