नांदेड : जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील तळेगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महिला व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या मेळाव्यात आगामी निवडणुकांमध्ये प्रभावी प्रचारयंत्रणा उभारणी, पक्षाचे ध्येयधोरण आणि भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणे, कार्यकर्त्यांची बूथनिहाय बांधणी, महिला सहभाग वाढविणे, तसेच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीतील बदलांचा अभ्यास यावर सविस्तर चर्चा झाली.
https://youtu.be/9ljDW9bynbg?si=1dWILQsCOE0nB3f9
सुजात आंबेडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “वंचित बहुजन आघाडी ही फक्त राजकीय पक्ष नसून, सामाजिक न्याय, समानता आणि परिवर्तनाची चळवळ आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परिसरात लोकांशी थेट संवाद साधून संविधानिक मूल्यांवर आधारित राजकारण जनतेपर्यंत
पोहोचवावे.”
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रभर सुरू असलेल्या सुजात आंबेडकर यांच्या दौऱ्याचा हा एक भाग असून, या माध्यमातून निवडणूक पूर्वतयारी मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे.
या वेळी मंचावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ता कैलास वाघमारे, नांदेड जिल्हाध्यक्ष शिवा नरंगळे, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे तसेच स्थानिक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मेळाव्याच्या शेवटी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा उंचावण्याचा निर्धार केला.





