परभणी : औरंगाबाद येथे २४ ऑक्टोबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीने RSS कार्यालयावर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढल्यानंतर सोशल मीडियावर बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक आणि मानहानीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यातील पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, RSS मधील काही व्यक्तींनी सोशल मीडियावर बनावट (फेक) फेसबुक अकाऊंट्सचा वापर करून बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द आणि मानहानीकारक कमेंट्स व प्रतिक्रिया दिल्या आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुकवर अर्वाच्च भाषेत पोस्ट आणि कमेंट्स करून समाजात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
या चार जणांवर गुन्हा दाखल
आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या प्रताप आमले, शिवम सरपोतदार, अण्णासाहेब जगदाळे, आणि भाऊ जगदाळे या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली होती.
या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी पाथरी पोलीस निरीक्षक, पाथरी पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय, पाथरी येथे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन पाथरी पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपींवर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे आणि आंबेडकरी चळवळीतील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





