मुंबई : घाटकोपर येथील त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर नगर प्रवेशद्वार परिसरात २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) काढलेल्या पथसंचलनाच्या घटनेवरून आता नवा वाद उफाळून आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी काही धम्मबांधवांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती मिळाल्याने, वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
त्यांनी थेट पंतनगर पोलीस ठाण्यात जाऊन या संपूर्ण घटनेबद्दल ५ महत्त्वाच्या मुद्द्यांवर खुलासा करण्याची मागणी केली आहे. या पत्राद्वारे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर आणि आरएसएसला दिलेल्या कथित परवानगीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी काढलेल्या पथसंचलनासाठी पोलीस परवानगी घेतली होती का?
२. आरएसएसने परवानगीसाठी त्यांचे नोंदणीकृत प्रमाणपत्र सोबत दिले होते का? दिले असल्यास, त्याची एक प्रत उपलब्ध करून द्यावी.
३. जर आरएसएस ही नोंदणीकृत संघटना नाही, तर मग पोलीस ठाण्याने १७५ लोकांना ‘दांडूके घेऊन’ रस्त्यावर पथसंचालन करण्यासाठी कोणत्या आधारावर किंवा कुणाच्या शिफारशीने परवानगी दिली?
४. जर आरएसएस नोंदणीकृत संघटना नाही, तर मग पंतनगर पोलीस ठाणे व महाराष्ट्र शासनाने त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी कोणते शुल्क आकारले होते की ही सुरक्षा मोफत देण्यात आली? मोफत दिली असल्यास, नागरिकांच्या कष्टाचा पैसा का खर्च करण्यात आला?
५. परवानगी नाकारल्यावर कारवाई : जर पंतनगर पोलीस ठाण्याने आरएसएसला परवानगी नाकारली होती आणि तरीसुद्धा १७५ लोकांनी दांडूके घेऊन पथसंचालन काढले, तर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे का?
घाटकोपर माता रमाई आंबेडकर नगरमधील काही बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्याची मागणी करण्यात येत आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे, वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी, वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई यांच्यासह अनेक जण उपस्थित होते






