नाशिक : शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने नाशिक शहर पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे म्हणाले की, गुन्हेगारांना राजकीय पाठिंबा मिळत आहे आणि सत्ताधारी महायुतीच्या सर्व पक्षांकडून गुंड पोसले जात आहेत. त्यामुळे या ‘गुंड पोसणाऱ्या राजकीय आकांवर’ कठोर कारवाई करावी, अशी मागणी गांगुर्डे यांनी केली.
शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात खालील महत्त्वाच्या बाबी आणि कारवाईची मागणी केली आहे:
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्याभरात नाशिक शहरात गुन्हेगारीने थैमान घातले आहे. या कालावधीत जवळपास ४६ खून झाले आहेत. यासह, जीवे मारण्याचा प्रयत्न, हत्याराचा धाक दाखवणे, ड्रग्स आणि अंमली पदार्थांचे अवैध धंदे, आणि गोळीबार प्रकरणांमुळे शहर हादरून गेले आहे.
- या वाढत्या गुन्हेगारीवर चाप बसवण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांची छाननी करून त्यांच्यावर हद्दपारी किंवा तडीपारीची कारवाई करावी.
- सध्या घडलेले गुन्हे पाहता अनेक गुन्हेगार हे सत्ताधारी पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे सत्तेतील नेत्यांसाठी समुपदेशन शिबीर आयोजित करावे.
- अटक केलेल्या प्रत्येक गुन्हेगाराची त्यांच्या प्रभागात ‘धिंड’ काढण्यात यावी.
- एमडी ड्रग्स सारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर कठोरपणे आळा घालण्यासाठी त्वरित प्रयत्न करावेत.
या शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्यासह ज्येष्ठ नेते आणि माजी स्थायी समिती सभापती संजय साबळे, महासचिव विनय कटारे, प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, महिला जिल्हा अध्यक्ष उर्मिला गायकवाड, महासचिव प्रतिभा पानपाटील, संघटक सागर रिपोर्टे, युवा आघाडीचे मनोज उबाळे, शरद सोनावने आदी नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
Nashik Shaken by Rising Crime VBA Delegation Submits Memorandum to Police Commissioner Demands Action Against Politically Shielded Criminals