लेखक – आकाश मनिषा संतराम shelarakash702@shelarakash702gmail-com
अकोला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त झालेल्या भव्य धम्म मेळाव्यात देशभरातून आलेल्या अनुयायांचा प्रचंड जनसागर उसळला. या ऐतिहासिक मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीव्र टीका करत लोकशाही आणि सामाजिक न्यायाचे भान पुन्हा एकदा जनतेसमोर ठेवलं. ” देश वाचवायचा असेल, तर मोदींना टाटा, बाय बाय करा,” हा त्यांचा थेट संदेश जनसमुदायाच्या मनात खोलवर पोहोचला.
गेल्या ४१ वर्षांपासून अखंडपणे चालत आलेला अकोल्याचा धम्म मेळावा हा म्हणजे फक्त धार्मिक सोहळा नाही, तर तो सामाजिक आणि राजकीय जागृतीचा मंच आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या पुढाकाराने आयोजित या मेळाव्यात दरवर्षी शेतकरी, ओबीसी, दलित, आदिवासी आणि वंचित समाज धम्मविचार घेण्यासाठी एकत्र येतो. यंदाही लाखोंच्या संख्येने जमलेल्या अनुयायांसमोर ॲड. आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर ठोस भूमिका मांडली.
आपल्या भाषणात त्यांनी ओबीसी समाजाला सावधगिरीचा इशारा दिला. ओबीसींचा घात भाजप आणि आरएसएसने केला असून, स्थानिक पातळीवरील ओबीसी नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. “राजकीय आरक्षण गेलं, तर शैक्षणिक आरक्षणही जाणार. हा इशारा नाही, तर गंभीर संकट आहे. ओबीसी समाजाने वेळीच जागं व्हावं,” असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थित जनतेत चिंतन आणि चेतना निर्माण झाली.
देशातील सध्याच्या परराष्ट्र धोरणावरही त्यांनी कठोर शब्दांत प्रहार केला. “स्वतःला विश्वगुरु म्हणवणारे मोदी देशाच्या संकटात भर घालत आहेत. जगभरात भारतीय नागरिकांना अपमानास्पद वागणूक मिळते आहे. हे मोदींच्या चुकीच्या धोरणांचं दुष्परिणाम आहे,” असा आरोप त्यांनी केला. जगभरातील सुमारे २० कोटी भारतीय परत आले, तर देशातील व्यवस्थेवर जबर ताण येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. “विश्वगुरु म्हणवणाऱ्या मोदींना परदेशात कशी वागणूक दिली जाते, याचे हजारो व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. एवढा अपमान कोणत्याही भारतीय पंतप्रधानाचा झालेला नाही,” असं ते म्हणाले.
याचबरोबर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या अपयशाकडे लक्ष वेधले. “भारताचं सैन्य सज्ज आहे, पण लढणार कुठून? पाकिस्तानकडे जगभरातून युद्धसाहित्य येत आहे, आणि भारताकडे एकही मित्र देश उरलेला नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पहलगाम हल्ल्यानंतर भारत एकटा पडला, हे सत्य जनतेसमोर मांडत त्यांनी मोदींना हटवण्याचे आवाहन केले. “ही परिस्थिती बदलायची असेल, तर मोदींना टाटा, बाय बाय करा. मोदींचं आणि जगाचं भांडण आहे भारतीयांचं नाही,” असे ते ठामपणे म्हणाले.
आंबेडकर म्हणाले की, मोदी फक्त स्वतःचा ‘इगो’ वाचवण्यासाठी काम करत आहेत. देशाच्या खऱ्या प्रश्नांकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षणातील असमानता, महागाई आणि सामाजिक विभाजन या सर्व प्रश्नांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी केवळ मोठमोठ्या घोषणा दिल्या जात आहेत. “देश महत्त्वाचा की व्यक्तीचा अहंकार? हे ठरवण्याची वेळ आली आहे,” असं आवाहन त्यांनी केले.अकोला पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झालेला हा मेळावा म्हणजे फक्त सभा नाही, तर विचारांचं आंदोलन आहे.
बुद्धांच्या ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्त्वानुसार सर्वांच्या कल्याणाचा मार्ग दाखवणारा हा सोहळा आजही समाजाला दिशा देतो. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्यात समाजाच्या तळागाळातील समस्या मांडल्या जातात. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीला धरून हा मेळावा समतेच्या दिशेने चालणाऱ्या संघर्षाचं प्रतीक ठरतो. “भवतू सब मंगल” या धम्मविचाराशी सुसंगतपणे बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक वर्षी सर्वांच्या उन्नतीचा संदेश देतात.
या वर्षीच्या मेळाव्यातील गर्दी पाहून एक गोष्ट स्पष्ट झाली लोक अजूनही विचारांवर विश्वास ठेवतात. समतेचा, न्यायाचा आणि मानवीयतेचा संदेश आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. तथापि, या इतक्या मोठ्या ऐतिहासिक कार्यक्रमाकडे प्रस्थापित मिडियाने दुर्लक्ष केल्याचं दु:खही व्यक्त करण्यात आलं. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवला जाणारा मीडिया जर अशा विचारप्रधान चळवळींकडे दुर्लक्ष करत असेल, तर ते लोकशाहीच्या आरोग्यासाठी धोक्याचे संकेत आहे.
अकोल्याचा धम्म मेळावा हा सामाजिक जागृतीचा दीपस्तंभ आहे. बुद्धांच्या करुणेचा, आंबेडकरांच्या समतेचा आणि आधुनिक भारताच्या सामाजिक संघर्षांचा संगम या मैदानावर दरवर्षी घडतो. इथं समाजाला स्वतःकडे पाहायला शिकवलं जातं, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद दिली जाते. देश माणसांच्या विचारांनी चालतो, व्यक्तीपूजेने नाही.
आज देशासमोर अनेक आव्हानं आहेत; जातीय विभाजन, धार्मिक ध्रुवीकरण, बेरोजगारी आणि असमानतेची खोल दरी. अशा वेळी लोकशाहीचा पाया मजबूत ठेवण्यासाठी जागृती आणि संघटन अत्यावश्यक आहे. अकोल्यातील मेळाव्यातून दिलेला संदेश म्हणजे जनतेला पुन्हा एकदा विचार आणि कृतीच्या मार्गावर आणण्याचे आव्हान आहे.
बाळासाहेब आंबेडकर यांनी शेवटी सांगितलं, “देश वाचवायचा असेल, तर मोदींना टाटा, बाय बाय करा. देशाचं भविष्य ठरवण्याचा अधिकार जनतेकडे आहे.” त्यांच्या या शब्दांत राजकीय विरोधापेक्षा लोकशाहीच्या संरक्षणाची भावना अधिक तीव्र होती.अकोल्याचा मैदानावरून घुमलेला बाळासाहेबांचा आवाज देशभर घुमत राहणार आहे, तो आवाज आहे समतेचा, विचारांचा आणि लोकशाहीचा. समाजात भेदाभेद विरहित समाज, अन्याय विरहित समाज आणि प्रत्येकाला माणूस म्हणून जगता येईल असा भारत घडवण्याचा निर्धार या मेळाव्याने पुन्हा दृढ केला आहे.