अकोला : ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांचे आगमन झाले. शहरात ठिकठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले, ज्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
रेल्वे स्थानकापासून क्रिकेट क्लब मैदानापर्यंत निघालेल्या मिरवणुकीदरम्यान, आंबेडकरी अनुयायी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. लेझीम पथके, आकर्षक देखावे आणि ढोल-ताशांच्या गजरात ‘डॉ. बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागतासाठी रस्त्यांच्या दुतर्फा जमलेल्या हजारो नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे धम्म मेळाव्याला राजकीय शक्तीप्रदर्शनाचे स्वरूप आले. अकोला पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी बौद्ध अनुयायी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.