चेन्नई : तमिळ अभिनेता आणि नव्याने राजकारणात उतरलेले थलपती विजय यांच्या तामिळनाडूतील करूर येथील रॅलीत शनिवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. चेंगराचेंगरी होऊन किमान ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
राजकारणात ‘एन्ट्री’ केलेले ‘तमिझगा वेत्री कळगम’ (TVK) पक्षाचे प्रमुख थलपती विजय यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर प्रचारसभांना सुरुवात केली आहे. सभा शनिवारी करूर येथे आयोजित करण्यात आली होती. विजय यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारो चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. (Thalapathy Vijay)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दी अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असल्याने आणि ती अनियंत्रित झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. गर्दीचा प्रचंड दाब वाढल्याने अनेक लोक खाली कोसळले आणि त्यांच्यावर लोक पडल्याने ही दुर्घटना घडली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच विजय यांनी आपले भाषण तात्काळ थांबवले.