नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो बौद्ध अनुयायी देशभरातून नागपूरच्या दीक्षाभूमी येथे दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान बौद्ध अनुयायांना टोलमाफी देण्याची मागणी केली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी नागपूरला येतात. या अनुयायांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी टोलमाफीचा निर्णय घेणे आवश्यक आहे.
“धम्मचक्र प्रवर्तन दिन हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, तो सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश देणारा ऐतिहासिक दिवस आहे. राज्य सरकारने यंदा अनुयायांच्या सोयीसाठी टोलमाफी करावी, अशी आमची अपेक्षा आहे,” असे आंबेडकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. याबाबत सरकार कोणता निर्णय घेते याकडे बौद्ध समाजाचे लक्ष लागले आहे.