औरंगाबाद : सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तसेच महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती (BANRF – 2023) ची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, संशोधक विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्ती हा अत्यंत महत्त्वाचा आधार असून, या शिष्यवृत्तीमुळे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व संशोधन कार्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळते. परंतु शासनाकडून 2023 सालाची अधिछात्रवृत्ती जाहिरात अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
या दिरंगाईमुळे हजारो संशोधक विद्यार्थी अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहेत. सम्यक विद्यार्थी आंदोलनाने शासनाकडे ठामपणे मागणी केली की, शिक्षण हा विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क असून त्यासाठी आवश्यक सुविधा वेळेत पुरवणे ही शासनाची जबाबदारी आहे. अधिछात्रवृत्तीच्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात होणारा विलंब हा विद्यार्थ्यांवरील अन्याय असून शासनाने याकडे गंभीरतेने पाहून तातडीने जाहिरात जाहीर करावी.
अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये उद्रेक निर्माण होऊन राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. याप्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अक्रम खान, पदाधिकारी अमोल घुगे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची मागणी करत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन केले.