पुणे : पुणे शहरात एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल आणि मित्तल ग्रुपच्या कार्यालयांवर आयकर विभागाने अचानक छापे टाकले आहेत. या धडक कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने कृष्णकुमार गोयल यांच्या सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमधील कार्यालयासह त्यांच्या सिंध सोसायटीमधील घरावरही छापेमारी केली आहे. त्याचबरोबर, मित्तल ग्रुपच्या बंडगार्डन भागातील कार्यालयावरही छापा टाकण्यात आला आहे.
ही कारवाई नेमकी कोणत्या कारणाने करण्यात आली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या कारवाईमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या छाप्यांमधून काही मोठे आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मित्तल ग्रुपची यापूर्वीही चौकशी
विशेष म्हणजे, मित्तल ग्रुपच्या ऑनेस्ट शेल्टर्स एलएलपी प्रकल्पाची अंमलबजावणी संचालनालयाने (ED) यापूर्वीही चौकशी केली आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (महारेरा) च्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
महारेराने मुंबईतील वरळी येथील पॅलेस रॉयल प्रकल्पाच्या प्रवर्तक ऑनेस्ट शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून सुमारे 90 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. फ्लॅटचा ताबा देण्यास उशीर केल्यामुळे हा मोठा दंड ठोठावण्यात आला होता.