कोरेगाव : कोरेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लिंगायत समाजाच्या ७४ वर्षांच्या पार्वती गुरुलिंग धवनगिरे या महिलेच्या अंत्यविधीस गावातील काही धनाढ्य व प्रभावशाली व्यक्तींनी विरोध केला. या प्रकारामुळे संतप्त नातेवाईक व कार्यकर्त्यांनी पार्वतीबाईंचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या दारात आणून न्यायाची मागणी केली.
मात्र, पोलिसांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत, संबंधितांनी तहसील कार्यालयात जावे असा सल्ला दिला. यानंतर संतप्त जमावाने पार्वतीबाईंचा मृतदेह कर्जत (जि. अहिल्यानगर) येथील तहसील कार्यालयासमोर नेऊन ठेवला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण जाधव यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले, “जर या महिलेला न्याय मिळाला नाही, तर वंचित बहुजन आघाडी राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल.” गावातील काही मंडळींनी जातीच्या आधारावर अंत्यविधीला विरोध केल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.