औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २५ डिसेंबर हा दिवस स्त्री मुक्ती परिषद दिन म्हणून साजरा केला जातो. याचं पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हयातील रांजणगाव शेनपुंजी येथे भारतीय स्त्री मुक्ती परिषद पार पडली. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
यावेळी, वंचित बहुजन महिला आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हाप्रभारी अरुंधतीताई सिरसाठ यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून आपले विचार मांडले. काँग्रेस हा जातीयवादी पक्ष आहे त्यांना दलितांनची मते चालतात पण नेते चालत नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. वंचित बहुजन महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सविताताई मुंढे यांनी ही त्यांचे विचार मांडले. बाळासाहेब आंबेडकर यांनी मागील विधानसभा निवडणुकीत संधी दिली त्यामुळे बहुजन समाजाच्या समस्या मला प्रत्यक्षात जाणून घेता आल्या असे त्यांनी यावेळी म्हटले. डॉ. प्रज्ञा साळवे यांनीही त्यांचे मत यावेळी मांडले.
या स्त्री मुक्ती दिन परिषदेच्या अध्यक्षा ॲड. लताताई बामणे( वंचित बहुजन महिला आघाडी,औरंगाबाद) या होत्या. बाळासाहेबांनी महिलांना राजकारणात संधी दिली. स्त्रियांनी जात व्यवस्था आणि पितृसत्ताक वृत्ती या दोन्हींना पार केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना नरवडे यांनी केले.
तसेच या परिषदेत एकूण ७ ठरावाचे वाचन करण्यात आले आहे.
यावेळी, विद्याताई दिवेकर ( कन्नड, महिला तालुका अध्यक्ष), आशाताई मोरे, साधना पठारे, सीमा भंडारे, शालिनीताई बर्फे, शीतल बनकर, संगीता अंभोरे, सुजाताताई गायकवाड, खुशबू शेख, सुरोडकर ताई यांनी याचे वाचन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.