बुलढाणा : बुलढाणा जिल्हा महिला आघाडीच्या वतीने नांदुरा येथे ‘महिला मुक्ती दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या हक्क आणि अधिकारांबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी महिलांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासातील संघर्षावर प्रकाश टाकला.

या सोहळ्याला जिल्हयातील आणि तालुक्यातील विविध राजकीय महिला पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली, त्यामध्ये विशाखा सावंग (जिल्हा अध्यक्ष, महिला आघाडी, बुलढाणा), छाया बांगर (भारतीय बौद्ध महासभा), प्रीती शेगोकार (जिल्हा उपाध्यक्ष) यांच्यासह नांदुरा व मोताळा तालुक्यातील महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी एकजूट होण्याचे आवाहन केले. नांदुरा आणि मोताळा तालुक्यातील महिलांनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिला, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला.






