मविआसोबत युतीसाठी शेवटपर्यंत आमचे दरवाजे उघडे
अकोला : काँग्रेसकडे आम्ही कोणत्याही अटी ठेवलेल्या नाहीत. आम्ही केवळ एवढेच म्हणालो आहोत की, त्या तुमच्या 7 जागांबाबत माहिती द्या. आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करायला तयार आहोत. आमच्यासोबत त्यांचा कोणताही संवाद झाला नाही. मात्र, आम्ही आशा करतो की, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसने या प्रस्तावावर त्यांचा काय विचार आहे ते कळवावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केले.
महाविकास आघाडीत आजपर्यंत 10 जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच चालू आहे. 5 जागांवरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच चालू आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आमच्या पक्षाने अशी भूमिका घेतली आहे की, महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी आम्हाला 7 जागांची माहिती द्यावी. तिथे त्यांना वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देईल. आमच्या मदतीने काँग्रेस त्या जागा जिंकेल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले, राजकारणात कोणासोबत अच्छे दिवस नसतात आणि बुरे दिवसही नसतात. सगळे दिवस सारखेच असतात. राजकारणात सकारात्मक असणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही कोणालाही सोडलेलं नाही. आम्ही काँग्रेस संदर्भातली भूमिका मांडली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबतची भूमिका अजून मांडलेली नाही.
आमचा कोणी विश्वासघात केला नाही आणि आम्ही कोणाचाही विश्वासघात केला नाही. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसला 7 जागांवर सहकार्य करावे, असा आम्ही निर्णय घेतला आहे, भाजपला हरवण्यासाठी जी पावलं उचलावी लागतील, ती पावलं आम्ही उचलणार आहोत. महाविकास आघाडीसोबतच्या युतीसाठी आमचे दरवाजे शेवटपर्यंत उघडे आहे असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.
वंचितला बदनाम करणे योग्य नाही
महाविकास आघाडीत भांडण आहे. त्यांच्यात जागावाटप होत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करणे योग्य नसल्याचेही आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.