सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा
वर्धा : वर्धा विद्यापीठात धक्कादायक प्रकार घडला आहे. जननायक बिरसा मुंडा यांची जयंती करण्यापासून विद्यार्थ्यांना रोखण्यात आले. या घटनेने विद्यार्थी आक्रमक झाले असून विद्यापीठावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विद्यार्थ्यांना वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या प्रशासनाने जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यापासून रोखले आहे.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाची अधिकृत पूर्वसूचना विद्यापीठाच्या प्रशासनाला एक दिवस आधीच दिली होती. मात्र, याची सूचना देऊनही, प्रशासनाने जयंती साजरी करण्यावर अचानक बंदी घातली.ज्यावेळी विद्यार्थी निर्धारित कार्यक्रमस्थळी पोहोचले, तेव्हा तिथे सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि प्रशासकीय अधिकारी तैनात होते. त्यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रम न घेण्यास सांगितले आणि जर कार्यक्रम घेतला तर विद्यापीठ प्रशासन कारवाई करेल, असे देखील बोलले.
यावेळी, कुलसचिव यांच्या निर्देशानुसार कार्यक्रमाला परवानगी नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विद्यापीठाच्या अशा प्रकारे दिलेल्या वागणुकीने त्यांच्या या बंदीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी शांततेत निषेध नोंदवला.
भेदभावाचा गंभीर आरोप –
यावेळी विद्यार्थांनी विद्यापीठावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, विद्यापीठाच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) नियमित शाखा कोणत्याही अडथळ्याशिवाय भरली. यावर प्रशासनाने कोणतीही हरकत घेतली नाही. असा प्रश्न विद्यार्थांनी उपस्थित केले.
“महाराष्ट्रातील एकमेव केंद्रीय विद्यापीठात बिरसा मुंडा जयंती साजरी करणे हा गुन्हा आहे का, तर RSS ची शाखा मात्र खुलेआम का भरू शकते?”
याबाबत प्रशासनाने “तुमचा कार्यक्रम होऊ देऊ नये, असा वरतून आदेश आहे,” असे उत्तर दिले. यामुळे विद्यापीठ प्रशासन आरएसएसला संरक्षण देत असल्याचे सिद्ध होते, असा विद्यार्थ्यांचा दावा केला.





