नाशिक : अचानक बंद पडलेल्या कंपनीतील 40 कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने उभारलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी बंद झाल्यामुळे हे कामगार रस्त्यावर आले होते.
रविवार दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी प्रशासन आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी वेळ दिला होता. अखेर चर्चेनंतर मध्यम मार्ग काढण्यात आला असून, दोन महिन्यांच्या ऐवजी दीड महिन्याचा पगार देण्यास कॉन्ट्रॅक्टरने लेखी मान्यता दिली. त्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.या यशस्वी आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीने विशेष मेहनत घेतली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सागर रिपोटे, विश्वनाथ भालेराव, महासचिव दीपक पगारे, अमोल चंद्रमोरे, नितीन बर्वे, अनिकेत गांगुर्डे, नाना तपासे, ग्रामीण तालुका अध्यक्ष विकी वाकळे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे रस्त्यावर आलेल्या कामगारांच्या हक्काचा विजय झाला असून, या लढ्याला कामगारांनी मोठा पाठिंबा दर्शविला आहे.