मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’, ‘ओम शांति ओम’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ चरित्र आणि विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, किडनी निकामी झाल्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना तातडीने दादर येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे मित्र अशोक पंडित यांनी दिली. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला.
सतीश शाह यांनी ‘हम आपके हैं कौन’, ‘फना’, ‘जाने भी दो यारों’ अशा अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून बॉलिवूडने एक हरहुन्नरी आणि प्रतिभावान कलाकार गमावला आहे.
चारच दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन झाले होते आणि पाठोपाठ सतीश शाह यांनीही जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूडला हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन कलाकारांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.




