औरंगाबाद : वंचित बहुजन युवा आघाडीने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात विना परवानगी आरएसएसच्या अनधिकृत स्टॉलवर आक्षेप घेतल्यानंतर वंचितचे औरंगाबाद युवा शहराध्यक्ष राहुल मकासरे, विजय वाहूळ आणि अन्य कार्यकर्त्यांवर वेदांत नगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेले ‘खोटे’ गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात वंचित बहुजन युवा आघाडीने निवेदन सादर केले आहे.आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने औरंगाबाद पोलीस आयुक्तांची भेट घेतली व मागणी केली की, १८ ऑक्टोबर रोजी मकासरे व अन्य व्यक्तींवर राजकीय दबावाखाली गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संवेदनशील घटनांमध्ये पोलीस गुन्हा नोंदवायला १२ ते १५ तास लागतात, मात्र राजकीय विषयात तात्काळ प्रक्रिया होते, आणि विशेषतः फिर्यादी नसताना पोलीस स्वतः फिर्यादीची भूमिका बजावत आहेत, हे निंदनीय असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडीने म्हटले आहे. शहरातील इतर गुन्ह्यांमध्ये पोलीस स्वतः किती वेळा फिर्यादी झाले आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या मागण्या :
१. राहुल मकासरे व अन्य व्यक्तींवर दाखल केलेले गंभीर आरोपाखालील गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत.
२. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर जातीवाचक शब्द वापरणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा.
३. घटनास्थळी उपस्थित नसलेल्या उच्चशिक्षित युवकांची नावे सुनियोजितपणे एफ.आय.आर. मध्ये समाविष्ट केली आहेत, ती तत्काळ वगळण्यात यावीत.
४. शैक्षणिक परिसराचे वातावरण खराब करणे आणि विनापरवानगी कार्यक्रम राबविल्याबद्दल संबंधित संघटनेवर कार्यवाही करण्यात यावी.
५. नोंदणी नसणाऱ्या आणि पूर्वी चार वेळा बंदी आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) महाविद्यालयाने परवानगी दिली असल्यास, शैक्षणिक परिसर धार्मिक व राजकीय दूषित केल्याबद्दल महाविद्यालय प्रशासनावर गुन्हा नोंद करण्यात यावा.
६. १० ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत वेदांत नगर पोलिसांना आलेल्या राजकीय व्यक्तींच्या फोन कॉल्सची सीडीआर (CDR) द्वारे चौकशी करण्यात यावी.
वरील मागण्या पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर पक्षाच्या वतीने लाखोचा मोर्चा काढण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.