चंद्रपूर : येत्या 15-16 ऑक्टोबर 2025 रोजी चंद्रपूर महानगरीत धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा होणार असून, यानिमित्ताने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून लाखो अनुयायी पवित्र दिक्षाभूमीला भेट देण्यासाठी येतात. संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्पर्शामुळे ही भूमी अत्यंत महत्त्वाची आहे.
ही गर्दी लक्षात घेता, वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने प्रशासनाकडे विविध महत्वाच्या सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली. संघटनेच्या महानगर अध्यक्षा तनुजा रायपूरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना सादर करण्यात आले, तसेच त्याच दिवशी प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांच्याशी देखील सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
प्रमुख मागण्या:
- महिला सुरक्षेसाठी “दामिनी पथक” तैनात करणे
- स्त्रियांसाठी सुलभ स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे, कारण मागील वर्षी महिलांना यामुळे त्रास झाला होता.
- प्रत्येक स्टॉल धारकाला कचरा व्यवस्थापनाची सक्त ताकीद देणे, तसेच भोजनदान करणाऱ्यांनी रस्त्यावर कचरा टाकू नये यासाठी सूचना फलक लावणे.
- महानगरपालिकेने जागोजागी कचरापेट्या (डस्टबिन) ठेवाव्यात.
- दिक्षाभूमीचे थेट प्रक्षेपण शहरात जिथे LED स्क्रीन आहेत तिथे दाखवण्यात यावे.
- “दिक्षाभूमी चौक” नामकरण करून तेथे डिजिटल बोर्ड लावण्यात यावा व सुशोभीकरण करून उद्घाटन जल्लोषात करण्यात यावे.
यावेळी तनुजा रायपूरे, महानगर अध्यक्षा, मोनाली पाटील, चंद्रप्रभा रामटेके, इंदू डोंगरे, विजया भगत, पौर्णिमा जुनघरे, शोभा वाघमारे, ललिता दुर्गे, उषा तामगडे, तेजराज भगत, सुभाष थोरात आदी उपस्थित होते.