वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षपातीपणा केला उघड !
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर शहरात आचारसंहिता लागू होऊन आठ दिवस उलटले आहेत. मात्र प्रत्यक्षात आचारसंहितेची अंमलबजावणी समानपणे होत नसल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. पुण्यातील बाजीराव रोडवरील दोन बसस्टॉपपैकी एका बसस्टॉपवरील नाव झाकण्यात आले असताना, त्याच ठिकाणी जनतेच्या पैशातून उभारलेल्या आणि केंद्रीय मंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाच्या बसस्टॉपवरील फलक मात्र उघडाच ठेवण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे.
आचारसंहिता लागू असताना एका ठिकाणी नियम पाळले जातात आणि शेजारीच सत्ताधारी पक्षाच्या खासदारांच्या नावाची चमकोगिरी सुरू राहते, हे लोकशाही मूल्यांना धरून नाही, असा सवाल वंचित बहुजन युवा आघाडीने उपस्थित केला आहे.
आचारसंहिता सर्व पक्षांसाठी समान आहे की सत्ताधाऱ्यांसाठी वेगळी, असा थेट प्रश्न उपस्थित करत प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे का, अशी शंकाही व्यक्त करण्यात आली आहे. लोकांचा पैसा वापरून उभारलेल्या सार्वजनिक मालमत्तेवर सत्ताधारी नेत्यांची जाहिरात सुरू ठेवणे हा प्रकार निवडणूक प्रक्रियेची थट्टा करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा लोकशाहीविरोधी आणि पक्षपाती प्रकार वंचित बहुजन युवा आघाडीने जाहीरपणे उघड केला असून, निवडणूक आयोगाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सागर आल्हाट, महिला आघाडीच्या शहर महासचिव रेखाताई चौरे यांच्यासह युवा आघाडी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षता अबाधित ठेवण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे.






