मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (BMC) सत्ता प्रस्थापित करण्याच्या निर्धाराने वंचित बहुजन आघाडीने (VBA) कंबर कसली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून मुंबई प्रदेशाच्या वतीने प्रभाग समन्वयकांची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठीच्या रणनीतीवर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करताना, निवडणूक प्रचार यंत्रणांचा प्रभावी वापर कसा करावा, स्थानिक स्तरावरील जनतेचे प्रश्न कसे हाताळावेत, तसेच पक्षाचे विचार व ध्येय-धोरणे समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे कसे पोहोचवावेत यावर जोर दिला. याव्यतिरिक्त, निवडणुकीदरम्यान येणाऱ्या संभाव्य आव्हानांवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही सखोल चर्चा झाली.
बैठकीला उपस्थित असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि प्रभाग समन्वयकांनी आगामी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर पक्षाची सत्ता निश्चितपणे प्रस्थापित करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सागर गवई, तसेच सर्व आघाड्यांचे महासचिव, प्रभाग समन्वयक आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.