पुणे : ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या ठाम, दूरदर्शी व दिशादर्शक नेतृत्वाखाली पुणे शहर वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पुणे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, विधानसभा व प्रभाग समन्वयक, प्रभाग पदाधिकारी तसेच लढाऊ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सखोल व व्यापक चर्चा करण्यात आली. मार्गदर्शन करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ठामपणे स्पष्ट केले की, वंचित बहुजन आघाडी ही केवळ पर्याय नसून, पुणे महानगरपालिकेतील निर्णायक राजकीय शक्ती बनणार आहे. निवडणूक फक्त लढवायची नाही, तर ती जिंकायचीच, असा निर्धार प्रत्येक कार्यकर्त्याने केला पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
तसेच पुढे त्यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सर्व प्रभागांत ताकदीने उभे राहतील, तसेच प्रत्येक प्रभागात संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून इतर सर्व राजकीय पक्षांच्या राजकीय गणितांना धक्का देण्याची तयारी ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

बैठकीत असेही नमूद करण्यात आले की, आज देश व राज्यात सत्तेच्या जोरावर लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय व मूलभूत हक्कांवर घाला घालणाऱ्या भाजपविरोधात ही पुणे महानगरपालिका निवडणूक जनतेचा जनआक्रोश ठरणार आहे. पुण्यातील बहुजन, कष्टकरी, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी, अल्पसंख्याक व उपेक्षित घटकांचा बुलंद आवाज वंचित बहुजन आघाडी ठामपणे मांडणार आहे.
पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून सांगण्यात आले की, फक्त घोषणा न करता घराघरांत पोहोचणे, प्रभागनिहाय स्थानिक प्रश्न उचलून धरणे, संघटन वाढवणे आणि वंचित बहुजन आघाडीला पुण्यातील सत्तेचा केंद्रबिंदू बनविण्यासाठी जोमाने काम करावे. येणाऱ्या निवडणुकीत वंचितचा प्रत्येक उमेदवार हा जनतेचा खरा प्रतिनिधी असेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
पुणे महानगरपालिका निवडणूक ही आता केवळ लढत नसून, वंचित बहुजन आघाडीच्या निर्णायक उदयाची सुरुवात आहे. येत्या निवडणुकीत पुण्यातील राजकीय चित्र बदलणार असून, इतर सर्व राजकीय पक्षांना वंचित बहुजन आघाडीची धास्ती वाटेल, अशी ताकद संघटनेत निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला.
या बैठकीत राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग व प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी बैठकीची प्रस्तावना मांडली.
यावेळी अध्यक्षा अनिता चव्हाण, युवा आघाडी अध्यक्ष सागर आल्हाट, माथाडी अध्यक्ष विशाल कसबे, सम्यक विद्यार्थी आंदोलन अध्यक्ष चैतन्य इंगळे आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख संदीप चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन महासचिव ॲड. रेखा चौरे यांनी केले.






