काहीही हातचे राखून न ठेवता एकूण एक प्रश्नांची उत्तरे देत आज डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे वंचित आणि शिवसेना ह्या दोन्ही पक्षाचे सुप्रीमो ह्यांनी युती जाहीर केली.त्यामुळे राज्यात आणि देशात वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडीया आणि सोशल मिडीया आज वंचित आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची शिवसेना ह्या पक्षाच्या युती मुळे सर्वाधिक चर्चिला जाणारी ब्रेकिंग न्यूज आहे.ह्याचे व्यापक परिणाम राज्याच्या राजकारणासह समाजकारणावर देखील होणार असल्याने हि युती प्रचंड लक्षवेधी ठरली आहे.बाळासाहेबांनी यापूर्वी काँग्रेसला युतीची ऑफर दिली होती.मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.आंबेडकरी राजकारणाची कोंडी फोडण्यासाठी शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता त्यातून आजची युती साकारली आहे.वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्रात ताकद असल्यामुळे या युतीचा फायदा भाजप विरोधी पक्षांना होणार आहे.या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय पर्यायाची स्पेस वंचित समूहाला आणि विखुरलेल्या शिवसेनेला उपलब्ध झाली आहे.बाळासाहेबांनीकालानुरूप पावले टाकून, आश्रित राजकारणामुळे आपल्या क्रांतिकारी जाणीवेचे व शक्तीचे खच्चीकरण होणार नाही, हे बघण्याची जबाबदारी घेवून सदर पाउल उचलेले आहे.राज्यभरात गावपातळीपर्यंत दोन्ही कडच्या पदाधिकारी कार्यकर्त्या मध्ये प्रचंड उत्साह आहे.महाराष्ट्रात सुरु असलेल्या धक्कादायक घडामोडी नंतर भाजपला वेसण घालणारा एक नवा अभिसरणाचा प्रयोग म्हणून राजकीय जाणकार ह्या कडे पाहत आहेत.हि युती होण्यापूर्वी मुख्यमंत्री ह्यांची राजगृहाची वारी आणि साहेबांची मुख्यमंत्री भेटीवर पेल्यात वादळ आणण्याचा प्रयत्न झाला होता.त्यावर बाळासाहेबांनी इंदू मिलच्या जागी उभ्या राहणाऱ्या स्मारकाबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती देत आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही.समाजरचनेसंबंधी आमचं भांडण आहे.जोपर्यंत त्यासंबंधी विचार केला जात नाही तोपर्यंत भाजपासोबत जाण्याचा संबंध नाही.जे कोणी भाजपासह जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने काही प्रतिसाद दिला नाही तर फक्त स्वबळावर लढण्याचा पर्याय आमच्याकडे आहे,” अशी स्पष्टोक्ती दिली होती.
ह्या युतीला ‘शिवसेना-वंचित युती : परिवर्तनाची नांदी असे संबोधन देत मधु कांबळे ह्यांनी डिसेंबर महिन्यात लोकसत्ता मध्ये लेख प्रकाशित केला होता.त्यात ते लिहितात की, ‘जूनमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर राज्यात नव्या समिकरणांची चर्चा सुरु झाली आहे. अर्थात या चर्चेचा प्रकाश झोत हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि ॲड. प्रकाश आँबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी या दोन राजकीय पक्षांच्या होऊ घातलेल्या युतीवर आहे. खुद्द उद्ध ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी युतीला अनुकूलता दर्शविली असून, त्याबाबत काही बैठकाही झाल्या आहेत. म्हणजे ही काही वाऱ्यावरची वरात नाही, तर दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते गांभिर्याने युतीबाबत चर्चा करीत आहेत.
सर्वात महत्वाचे विधान मधु कांबळे ह्यांनी केले आहे ते असे की, ‘आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांच्यातच मोठे परिर्तन झाल्याचे दिसत आहे. लोकशाही व संविधान संवर्धनाची भाषा ठाकरे बोलू लागले आहेत. आंबेडकरवादी पक्ष, संघटना, चळवळींमधून ठाकरे यांच्या या बदलेल्या भूमिकेचे स्वागत होत आहे.या पाश्वभूमीवर ठाकरे-आंबेडकर हे दोन दिग्गज नेते एकत्र येणे, हे केवळ महाराष्ट्राच्या राजकारणालाच नव्हे तर, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींनाही नवे वळण देणारे ठरू शकते.राज्यात आता बदललेल्या परिस्थितीत भाजपसारख्या बलाढ्या राजकीय शत्रुचा सामना करण्यासाठी शिवसेनेला वंचित आघाडीची ताकद हवीच आहे. वंचित आघाडीचेही शिवसेनेशी सूर जुळले तर, महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे परिवर्तन घडून आल्याचे दिसेल.’माझ्या मते हे लेखकाचे सर्वात महत्वाचे निरीक्षण आहे.
दुसरे महत्वाचे निरीक्षण आहे ते पूर्वीचा आंबेडकरी पक्षाचा युती आघाडीचा इतिहासा संदर्भात. ‘यशवंतराव चव्हाण यांनी प्रथम दादासाहेब गायकवाड यांना काँग्रेससोबत आणले होते.पुढे गवई, रूपवते, कांबळे, भांडारे, खोब्रागडे व रामदास आठवले ही नेतेमंडळी काही काळ काँग्रेससोबत राहिली.काँग्रेसने दलित नेत्यांना गृहीत धरले व त्यांना आमच्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण केली. काँग्रेससोबत राहिल्यामुळे संपूर्ण दलित समाज शासनकर्ता झाला का? राजकारणात तडजोडी करण्यात खरी गरज कुणाची होती- रिपब्लिकन पक्षाची की काँग्रेसची? हे सर्व आता दलितांना समजले आहे. पिढी बदलली की मते बदलतात म्हणून आजमितीला तरुण वर्गात काँग्रेसविषयी खूप चीड निर्माण झाली आहे. ही मंडळी वैतागली आहे, असे पाहणीअंती समोर आले आहे. काँग्रेसचा अनुभव या समाजाने घेतला आहे. काँग्रेससोबत मैत्री करून बघितली, आमची ससेहोलपट झाली, असे नव्या पिढीचे म्हणणे आहे. प्रबोधनकार ठाकरे व बाबासाहेब यांची वैचारिक जवळीक होती.अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात आहे.मुंबईतील वस्त्यांमध्ये भीमसैनिक व शिवसैनिक यांच्यात वितुष्ट राहिलेले नाही’, असे निरीक्षण असलेला असा एक लेख डॉ. पी. जी. जोगदंड, समाजशास्त्र विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ ह्यांनी १४ एप्रिल २०११ ला महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित केला होता.
आजच्या युतीचे राजकीय परिणाम संघ आणि भाजप दोघांना चिंताक्रांत करणारी आहेत.कारण २०१४ मध्ये झालेल्या १६व्या लोकसभा निवडणूकीत भारिप बहुजन महासंघाने राज्यात २३ उमेदवार उभे केले होते.त्यांना एकत्रित ३,६०,८५४ (०.७%) मते मिळाली होती.२०१४ मध्ये झालेल्या १३व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत भारिप बहुजन महासंघाने ७० उमेदवार उभे होते, मात्र त्यापैकी केवळ एकच आमदार विजयी झाला.सर्व उमेदवारांना एकत्रित ४,७२,९२५ (०.९%) मते मिळाली होती.मात्र वंचित ने २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, ४१,३२,२४२ (७.६४%) एवढी मते मिळवली होती.महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात ५,४०,५४,२४५ एवढे एकूण मतदान झाले होते,त्यात ४१,३२,२४२ हा वंचितचा वोट शेयर आहे.औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, अकोला या एका मतदार संघात वंबआ दुसऱ्या स्थानी होती तर ४१ मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ८० हजारांहून अधिक मते घेतली होती.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने २८८ पैकी २३६ जागा पक्षावर लढत २५,२३,५८३ मते घेतली होती.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष – मागील जागा – १२२, २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा – १०५, शिवसेना मागील जागा – ६३, २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – मागील जागा – ४१,२०१९ मध्ये जिंकलेल्या जागा – ५४.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- मागील जागा – ४२, २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा – ४४ असे पक्षीय बलाबल होते.वंचितने स्वबळावर केलेली मतांची बेगमी पाहता आणि सेना आणि वंचित अशी मतांची गोळाबेरीज राज्यातील आगामी सत्ता संपादनाची नांदी ठरते.कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या पक्षांनी राजकीय गरज आणि देशातील धोकादायक वळणावर आलेली लोकशाही पाहता पुढाकार घेतला पाहिजे.हे घडले तर भाजप आणि शिंदे गट राज्यात चटणीला सुद्धा उरत नाही.आजच्या युती निमित्ताने कॉंग्रेस राष्ट्रवादीने हे राजकीय समजूतदार भूमिका घेवून मविआला राजकीय बळकटी देण्याची भूमिका घेतली पाहिजे.त्याशिवाय भाजपला थांबविणे शक्य नाही.बाळासाहेब आंबेडकर आणि उद्धव ठाकरे ह्यांनी घेतलेल्या युतीच्या निर्णयाने राज्यात हा नवा पर्याय बळकट झाला आहे.कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने पुढे आले पाहिजे.आजच्या युतीचे सर्व स्तरावर होणारे समर्थन आणि स्वागत पाहता वंचित समुहाला सत्ताधारी करण्याचा बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे धोरणाच्या यशस्वितेची नांदी ठरेल.एका नव्या पर्वाच्या राजकीय अध्यायाची हि सुरुवात आहे.देशातील हुकूमशाही आणि ईडी सरकार आजच्या निर्णयामुळे हादरले आहे एवढे मात्र नक्की.मागील सर्व विसरून एकत्र आले पाहिजे हा आशावाद उद्धवजी आणि बाळासाहेब दोघांनी व्यक्त केला आहे, बॉल आता काँग्रेस राष्ट्रवादी च्या कोर्टात आहे.नक्कीच सकारात्मक विचार केला जाईल हा आशावाद आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
९४२२१६०१०१