पिंपरी : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर ‘वंचित बहुजन आघाडी’ने (VBA) कंबर कसली असून, उमेदवारांच्या निवडीसाठी थेट मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत पार पडणार आहेत. हॉटेल नमस्कार, विशाल टॉकीज शेजारी, पिंपरी याठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होतील.
दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती :
उमेदवारांच्या निवडीसाठी आणि मार्गदर्शनासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते ऍड. प्रियदर्शी तेलंग (राष्ट्रीय महासचिव), डॉ. अनिल अण्णा जाधव (राज्य उपाध्यक्ष), ऍड. सर्वजित बनसोडे (राज्य उपाध्यक्ष,नितीन गवळी (शहराध्यक्ष) शारदा बनसोडे ( महिला आघाडी शहराध्यक्ष), विनोद गायकवाड (अध्यक्ष, युवक आघाडी) उपस्थित राहणार आहेत.
कार्यकर्त्यांना आणि इच्छुकांना आवाहन :
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व मतदार, वंचित बहुजन आघाडीचे शुभचिंतक, समर्थक, नोंदणीकृत सभासद, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी या प्रक्रियेची नोंद घ्यावी.
विशेषतः महानगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहून आपल्या मुलाखती द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मुलाखतींच्या माध्यमातून सक्षम आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना संधी देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.






