औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून गाजत असलेल्या ‘रम्य’ प्रकरणावरून आज वंचित बहुजन आघाडीने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. विधानभवनात सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री कोकाटे पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण तापले आहे.
वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. “विधानभवनात महाराष्ट्र सरकार नावाचा ‘गेम’ सुरू आहे की काय अशी शंका आता जनतेला वाटू लागली आहे,” असे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी म्हटले. जनतेच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांवर सरकार निर्णय घेत असताना कृषीमंत्र्यांनी सभागृहात ‘रमी’ सारखा खेळ खेळणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे गांभीर्य धुळीस मिळवणारे आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली.
’रमी’ की ‘डुम्मी’?
पत्रकार परिषदेत कोकाटे यांनी “मी खेळत नव्हतो, मी स्किप करत होतो,” असे स्पष्टीकरण दिले होते. यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीने कोकाटे यांच्या स्पष्टीकरणाची खिल्ली उडवली. “जनतेने हेही पाहिलं की त्यांनी कुठला पत्ता टाकला,” असे म्हणत, एका नागरिकाने केलेल्या “काय खोटं बोलता राव! तुम्ही तर उघड उघड एक्का टाकला,” या टिप्पणीचा संदर्भ दिला. तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की झूम करून काय चालले आहे हे दिसते, त्यामुळे कोकाटे जनतेला वेड्यात काढत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
’जुगार क्रांती’ नव्हे, ‘श्वेत क्रांती’ची गरज
सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. मराठवाड्यात खताचा तुटवडा ही मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत कृषीमंत्र्यांनी सभागृहात पत्ते खेळणे म्हणजे त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही हेच दिसते, असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले. “आजपर्यंत कृषी मंत्र्यांनी, राजकीय नेत्यांनी देशात श्वेत क्रांती केली, हरित क्रांती केली, पण दुर्दैवानं महाराष्ट्रात जुगार क्रांती केली जाते असं म्हणायची वेळ आली आहे,” अशी घणाघाती टीकाही यावेळी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीने विधानसभा अध्यक्षांकडे या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज आणि ज्यांनी व्हिडिओ शूट केला आहे त्यांच्याकडून पूर्ण फुटेज मागवून तातडीने चौकशी करण्याची मागणी केली. “दूध का दूध, पाणी का पाणी” होऊन सत्य समोर यावे आणि कोकाटे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेने दिलेल्या शुभेच्छांचा संदर्भ देत, वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्या जागी शेतीची जाण असलेला सक्षम मंत्री नेमावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
केवळ ‘चूक आहे’ म्हणणे पुरेसे नाही
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर “हे चूक आहे” अशी प्रतिक्रिया दिली असली तरी, केवळ असे म्हणणे पुरेसे नाही, असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले. जनतेनं रस्त्यावर उतरायचं, जनतेनं केसेस घ्यायचे, आणि तुम्ही वाचवणार एक पत्ते खेळणारा मंत्री?” असा सवाल करत, सरकारने आपले चारित्र्य तपासावे असे आवाहनही केले.
शेवटी, कृषीमंत्र्यांनी सभागृहात मंत्रीपदावर बसून जनतेच्या जीवाशी खेळू नये, असे म्हणत त्यांना घरी पाठवून २४ तास ‘रमी’ खेळण्यास सांगितले. ही लढाई प्रामाणिकपणे सर्व पातळ्यांवर लढली जाईल, असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले.
भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया हिंगोली : “संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते” या प्रेरणादायी भावनेतून यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी...
Read moreDetails






