मुंबई : काँग्रेसकडून पुन्हा एकदा तोच जुना मीडिया खेळ सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. युतीबाबत प्रत्यक्षात कोणतीही ठोस घडामोड न घडता केवळ माध्यमांतून खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या चर्चा पसरवल्या जात असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलतांना वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस मुंबईत सोबत लढेल, असे वक्तव्य केले आहे. त्यावर गंभीर आक्षेप नोंदवत वंचित बहुजन आघाडीने विचारले आहे की, “काँग्रेसची मुंबई कमिटी हा खेळ नेमका किती वेळा खेळणार? जनता इतकी भोळी नाही की प्रत्येकवेळी ही खेळी ओळखणार नाही,” असा सवाल ही वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत विचारला आहे.
पुढे ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर काँग्रेसला खरोखरच आघाडी करायची असेल, तर केवळ वक्तव्ये आणि चर्चांच्या अफवा न पसरवता जागा वाटपाबाबत एक सन्मानजनक आणि ठोस प्रस्ताव अधिकृतरीत्या पाठवावा. “त्यानंतर आम्ही चर्चा करण्यास पूर्णपणे तयार आहोत”.
काँग्रेसचे काही नेते राजगृह येथे भेटीसाठी आले होते. मात्र, त्या भेटीनंतर कोणतीही पुढील कार्यवाही किंवा संवाद साधण्यात आलेला नाही. “तुम्ही तुमचे दरवाजे बंद केले असतील, पण आमचे दरवाजे आजही खुले आहेत,” असे स्पष्ट करत त्यांनी संवादासाठीची तयारी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
वंचित बहुजन आघाडी ही नेहमीच सन्मान, पारदर्शकता आणि समानतेच्या आधारावरच राजकीय भूमिका ठरवत आली आहे. माध्यमांतून पसरवलेल्या अपप्रचारावर किंवा अपूर्ण चर्चांवर कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.
दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असताना, अशा खोट्या चर्चांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. मात्र, वंचित बहुजन आघाडी स्पष्ट आणि ठोस भूमिकेवर ठाम असून, जनतेच्या हिताला प्राधान्य देतच पुढील निर्णय घेतले जातील.






