वसई : ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनापायी गुन्हेगारी कृत्ये करण्यापर्यंत तरुण पिढी कशी भरकटत चालली आहे, याचं एक भयानक उदाहरण वसईमध्ये समोर आलं आहे. ऑनलाइन गेम खेळण्यासाठी पैसे न मिळाल्याने एका ३२ वर्षीय मुलाने आपल्या सावत्र आईची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात आणि संपूर्ण समाजात खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
मृत महिलेचं नाव आरसीया खुसरो (वय ५२) असून, आरोपी मुलाचं नाव इम्रान खुसरो आहे. इम्रानला ‘व्हीआरपीओ’ (VRPO) नावाच्या ऑनलाइन गेमचं इतकं व्यसन होतं की, त्याला गेम खेळण्यासाठी १ लाख ८० हजार रुपयांची तातडीने गरज होती. त्याने हे पैसे आपली सावत्र आई आरसीया यांच्याकडे मागितले. मात्र, आरसीया यांनी पैसे देण्यास नकार दिला.
याच रागातून इम्रान शनिवारी (२६ जुलै २०२५ रोजी) बाभोळा येथील आरसीया यांच्या घरी गेला. तिथे त्याने आरसीया यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांची क्रूरपणे हत्या केली.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आणि उघडकीस आलेला गुन्हा
या धक्कादायक घटनेनंतर इम्रानने घडलेला प्रकार आपले वडील खुसरो यांना सांगितला. दोघा बाप-लेकांनी मिळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तात्काळ आरसीया यांचा मृतदेह दफन करून, त्यांचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी परिसरातील एका डॉक्टरकडून आरसीया यांना नैसर्गिक मृत्यू आल्याचं खोटं प्रमाणपत्रही मिळवलं होतं.
मात्र, त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला घरामध्ये रक्ताचे डाग दिसले आणि तिला संशय आला. तिने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि आरोपी इम्रान खुसरो आणि त्याचे वडील खुसरो यांना अटक केली. या गुन्ह्यात बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरचाही सहभाग असल्याचं समोर आलं असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.