पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार योजने’अंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2026 पर्यंत वाढवावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश कार्यकारिणीने केली आहे. या संदर्भातील निवेदन आज पुण्याचे समाजकल्याण आयुक्त यांना सादर करण्यात आले.
प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले आहे. अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठा आधार देणाऱ्या या महत्त्वाच्या योजनेपासून अनेक पात्र विद्यार्थी अर्ज न भरल्यामुळे वंचित राहण्याची शक्यता असल्याचे युवा आघाडीने निवेदनात म्हटले आहे.
युवा आघाडीने मुदतवाढ देण्यामागची प्रमुख कारणे निवेदनात स्पष्ट केली आहेत:
१) ऑनलाईन पोर्टलवरील समस्यांमुळे अर्ज भरण्यास विलंब होत आहे.
२) महाविद्यालयांकडून आवश्यक कागदपत्रे वेळेवर मिळण्यास विलंब.
३) अनेक विद्यार्थ्यांची उत्पन्न प्रमाणपत्रे, आधार सीडिंग आणि मोबाइल लिंकिंग आदी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
४) ग्रामीण, आदिवासी व उपनगरी भागात सायबर/महा ई-सेवा केंद्रांची उपलब्धता मर्यादित आहे.
या सर्व कारणांमुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अर्ज भरू शकलेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांशी व भवितव्याशी संबंधित असल्याने, अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले आहे.






