ढकांबे, दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील ढकांबे गावातील आदिवासी बांधवांनी गावातील ग्रामपंचायतची जागा आम्हाला रहिवासासाठी मिळावे म्हणून अनेक प्रयत्न केले. सदरील ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस सगळीकडे निवेदन देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. गावठाणाची जागा कमी असल्या कारणाने राहायचे कुठे? हा प्रश्न होता. म्हणून ग्रामपंचायत हद्दीमध्ये समस्त आदिवासी बांधवांनी झोपडी वजा घर बांधण्यास सुरवात केली. परंतु काही गावातील धन दांडग्यांनी त्या झोपड्या मोडून तेथील रहिवासी आदिवासी बांधवांना जातीवरून शिवीगाळ, त्यांनी बांधलेल्या झोपड्यांचे नुकसान केले आणि केवळ आदिवासी असल्याकारणाने गावकुसात जागा नाकारणे आदी प्रकार समाज कंटकांनी केला.
या प्रकरणी अँट्रॉसिटी गुन्हा पोलीस प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर नोंदवून घेतला. परंतु लगेचच फिर्यादीवर क्रॉस तक्रार करून दरोड्याचा गुन्हा नोंदवला. कुठल्याही प्रकारचा सबळ पुरावा नसताना आज 5 आदिवासी बांधव सेंट्रल जेलला आहेत. ज्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसतांना केवळ दबावापोटी पोलीस प्रशासनाने हे गुन्हे नोंदवून आदिवासी बांधवांवर अन्याय करणे चालूच ठेवले आहे. दरम्यान आज त्या आदिवासी बांधवांची भेट वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे यांनी त्यांच्या स्थानिक नेत्यांसोबत घेतली. येणाऱ्या काळात न्याय मिळवून देऊ आणि खोटे गुन्हे मागे घ्यायला लावून आदीवासी बांधवांस घर बांधण्यासाठी जागेचा लढा पुढाकार घेऊन लढू असा शब्द त्यांनी दिला. प्रसंगी वंचितचे गणेश शार्दूल, अरुण गायकवाड, बाळा शेजवळ, वैभव निकम, अमोल पडवळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.