स्वतःला B अक्षरापुरते मर्यादित का करता?
मुंबई : वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका. ती भाजपची बी टीम आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीवर करणाऱ्या तुषार गांधी यांना वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, तुषार गांधी, स्वतःला फक्त B अक्षरापुरतेच का मर्यादित ठेवत आहात?
वंचित आणि उपेक्षितांच्या स्वतंत्र, निर्भय, राजकीय आवाजाला बदनाम करायचे असेल तर आणखी अक्षरे निवडा. आम्ही तुमची मदत करतो, असे म्हणत इंग्रजी बाराखडीच गांधी यांच्यासमोर वंचितने मांडली आहे.
तुमचे काका राजमोहन गांधी १९८९ मध्ये राजीव गांधी यांच्या विरोधात लढले. मग ते बी-टीम आहेत का? तुमचे काका, पुन्हा २०१४ मध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार म्हणून काँग्रेस विरोधात उभे राहिले. त्यानंतर भाजप आणि काँग्रेसचा पर्याय म्हणून आप पुढे आली होती. इंडिया आघाडीत असलेली आप ही भाजपची बी-टीम आहे का? असे प्रश्न विचारत तुषार गांधी यांना जाब विचारला आहे.
दोन वेळा काँग्रेसच्या विरोधात लढलेले तुमचे काका राजमोहन गांधी बी-टीम आहेत का? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.