डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी चळवळीला स्वतःचं राजकीय प्रस्थ असतांनाही पुढे अनेक समस्यातुन अधोगतीला जावं लागलं होतं. परंतु पुढे आगेकूच करायची असेल, तर त्याच चूका पुन्हा घडू नये याची खबरदारी घ्यावी लागते. रिपब्लिकन चळवळीचा इतिहास सर्वज्ञान असतांना फुटीचे राजकारण पुढे व्हाया दलित पँथर येतच गेलं होतं. महाराष्ट्र हे देशभराच्या चळवळीचं मुख्य केंद्र असतांना अनेक गोष्टी या नकारात्मक होत होत्या. राजकीय यश संपादन न होणे हे याला एक कारण असतांना प्रस्थापितांच्या कुटनित्या ही त्याला जबाबदार आहे. परंतु प्रत्येक जबाबदारी त्यांच्यावरच टाकून हे मिटणार नसल्याने ‘आत्मपरीक्षणाची’ चळवळीवर गरज येऊन ठेपली असतांना ती जबाबदारी बाळासाहेब आंबेडकरांनी ओळखून पुढील ठरविलेल्या दिशा या पुन्हा नव्याने राजकीय इच्छाशक्ती जागरूक करून आंबेडकरी चळवळीला सत्ता स्थापनेचं स्वप्न दाखविणाऱ्या ठरल्या.
आज बाळासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने चळवळीचं आकलन करत आगेकूच करायची असेल, तर आम्हाला चुकांची पुनरावृत्ती होऊ न देणे ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. त्यासाठी बाळासाहेबांनी चळवळीच्या केलेल्या आखणीबाबत, भूमिकेबाबत आणि प्रत्येक कृतीवर तीक्ष्ण लक्ष ठेवावं लागणार आहे. त्याशिवाय ही राजकीय शक्ती बळकट होणार नाही अस माझं मत आहे.
रिपब्लिकन पक्षाची वाताहत झाली याच्या चार दशकाचे प्रत्यक्षदर्शी बाळासाहेब असतांना चुकांची पुनरावृत्ती न होऊ देण्यासाठी मुख्य दोन भूमिका या राजकीय चळवळीत प्रामुख्याने बजावल्या आहेत. एकाचवेळी सामाजिक आणि राजकीय मार्ग ते आखत होते. टीकाकारांनी याला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यामागील गंभीर आणि जबाबदार भूमिका या चळवळीला दिशादर्शक ठरल्या आहेत.
रिपब्लिकन पक्षाची रचना करत असतांना डॉ. राम मनोहर लोहिया, मधु लिमये, एस.एम. जोशी आदींसोबत विचार करण्याबाबत ही बाबासाहेबांची भूमिका ही राजकीय चळवळीचं प्रस्थ वाढविणे होतं हे समजते. यदा कदाचित आंबेडकरी चळवळ ही एकजातीय चळवळ राहू नये अशी बाबासाहेबांची दूरदृष्टी असल्याची शक्यता आहे. परंतु पुढे रिपब्लिकन पक्ष निर्मितीवेळी लोहिया आदींशी कुठली चर्चा न झाल्याने आणि तसेच बाबासाहेबां व्यतिरिक्त नेतृत्व म्हणून न स्वीकारण्याच्या इतरांच्या भूमिकेमुळे व बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर तत्कालीन पुढाऱ्यांच्या आपसी मतभेदांमुळे पुढे ही चळवळ एकजातीय झालीच! परंतु, बाळासाहेबांनी ही बाब लक्षात घेत या आंबेडकरी चळवळीच्या चुकीत दुरुस्ती करून बहुजनांच्या चळवळीची जोड दिली. याची कैक उदाहरण आपणास बघायला मिळतील.
त्याच पद्धतीने दुसरी भूमिका समजतांना आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत ज.वि. पवार यांच्या आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ (खंड :१) मध्ये मांडतात की, ‘रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेच्या वेळी एक गफलत झाली, ती म्हणजे पक्षाचे निवडणूक मंडळ न नेमण्याची. नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्या असल्यामुळे अशा मंडळाची आवश्यकता उरली नसल्यामुळे वा पक्ष स्थापनेच्या जल्लोषात ते काम राहून गेले हे खरे. आता राज्यसभेची निवडणूक आल्यामुळे अधिकृत उमेदवार ठरविण्याचा प्रश्न उपस्थित झाला. यावर एक तोडगा काढण्यात आला की, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे जे निवडणूक निवड मंडळ होते तेच रिपब्लिकन पक्षाचे निवडणूक मंडळ समजण्यात यावे.’ तात्पर्य हेच की, पार्लमेंटरी बोर्ड या संकल्पनेबाबत ही चर्चा करणारा एक वर्ग असतांना बाळासाहेबांनी येथे ही रिपब्लिकन पक्ष स्थापनेवेळी केलेली चूक याही वेळी होऊ दिली नाही. या पिढीच्या आंबेडकरी समूहाला आणि कार्यकर्त्यांना याचं सारख्या अनेक गोष्टी मान्य असल्याने वंचित बहुजन आघाडी नावाची ही जन चळवळ तग धरून राहिली.
जरी पार्लामेंट्री बोर्ड या संकल्पनेसह व्यक्तिकेंद्री टीका झाल्या. विश्वासाहर्यतेवर प्रश्न निर्माण करण्यात आले. पक्षीय ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न येथे ही केले गेले. विठ्ठल मंदिर आंदोलनासारख्या प्रश्नांवर बुद्धिभेद ही करण्याचे प्रयत्न झाले. परंतु, पक्षीय तोटा हा झालेला नाही अस माझं एकंदरीत आकलन आहे. याची कारणे ही बारीक निरीक्षणांती तपासले तर जाणवतं की, रिपब्लिकन पक्षाला कार्यकर्ता हा केवळ भावनिक मिळालेला होता. आणि स्वतःच्या कुरघोड्यांतच व्यस्त असलेला प्रत्येक नेता हा कार्यकर्ते एकसंध बांधण्यासाठी प्रशिक्षित करत नव्हता. परंतु बाळासाहेबांनी ही देखील चूक सुधारली आहे. वंचितांचे कार्यकर्ते राज्यात अनेक प्रशिक्षित उदाहरण आहेत. याआधी सुद्धा राज्यभर भारिप, बहुजन महासंघ, अन पुढे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रशिक्षित कार्यकर्ते, नवीन नेतृत्व घडवण्याची फॅक्टरी म्हणून बघितले जाते. पक्षाच्या हितापेक्षा आपल्या हिताचा विचार वाढू लागल्याने रिपब्लिकन पक्ष विखुरला होता. स्वतःचा नवा गट उभारण्याची आणि पक्षाचे ध्रुवीकरण करण्याचे कारस्थान येथे हाणून पाडण्यात आले. उलट ही पक्षाने टाकलेली कात आहे आणि ते सकारात्मक आहे. म्हणजेच, वंचित बहुजन आघाडीने फुटातुटीचे राजकारण सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने हाणून पाडलं. अशी ही चूक येथे टाळण्यात आली.
आंबेडकरी कार्यकर्ता हा आजवरच्या अनुभवांमुळे ताक ही फुंकून पित असतो. त्यामुळे अनेक निर्णयांसाठी त्याला जरा वेळ लागतो. तो आता संयमी आणि जबाबदार भूमिका घेत असतो. परंतु याचं सोबत योग्य दिशादर्शकाची जबाबदारी ही नेतृत्वाची ही असायला हवी, आणि ती बाळासाहेब निभावुन नेतांना दिसतात.
राज्यात वंचितची संघटनात्मक ताकद मोठी आहे. गावागावात वंचितच्या शाखा, पक्ष संघटन आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. ग्राउंड लेव्हलवर बेस पक्का झाल्यावर निवडणुका, यंत्रणा उभ्या राहिल्या, निवडणुका जिंकायला सोपं होतं, त्याचं ताजे उदाहरण राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला मिळालेलं यश हे बघितल्यावर समजतं.
वंचितांच्या राजकीय भूमिकेमुळे आंबेडकरी चळवळ पुन्हा यश शिखरावर जातांना दिसण्याचे असेच काही दुर्लक्षित कारणे आहेत. आता तीच समजत आपण सर्वांनी योग्य त्या भूमिकेवर काम करायला हवं. अन आंबेडकरी राजकारणाला नवीन आयाम देणाऱ्या वंचितच्या या लढ्यात सहभाग व्हायला हवे.
- संविधान गांगुर्डे