सुजात आंबेडकर : राहुल गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या EVM लढ्याला पाठिंबा द्यावा!
सोलापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झालेल्या आश्चर्यकारक 76 लाख मतांच्या वाढीविरोधात, तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या पळवलेल्या निधीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूर येथे जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आता फक्त 45 दिवसांसाठी निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवले जाणार आहे.
आयोगाने मोठा निर्णय घेत निवडणूकीचे सर्व व्हिडिओ आणि फोटो 45 दिवसात डिलीट करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आज निवडणूक आयोग, विविध प्रसारमाध्यमे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उद्देशून महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. निवडणूक आयोगाने ईव्हीएम (EVM) संबंधित सर्व डेटा ४५ दिवसांत डिलीट करण्याच्या निर्णयावर सुजात आंबेडकर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात बाळासाहेब आंबेडकर यांनी आव्हान दिले असून, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यापासून न्यायालयापर्यंत या आंदोलनात सक्रिय आहेत. “निवडणूक आयोगाला आपले पितळ उघडे पडू नये, असे वाटते म्हणूनच त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न चालवला आहे,” असे आंबेडकर म्हणाले.
त्यांनी सर्व प्रसारमाध्यमांना विनंती केली की, निवडणुकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीला जी प्रसिद्धी दिली जात नाही, ती आता या महत्त्वाच्या आंदोलनात मिळावी. राहुल गांधी यांना आव्हान देत सुजात आंबेडकर म्हणाले, जर तुम्ही खरंच मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष मानत असाल, एक दलित नेतृत्व मानत असाल आणि खरच EVM च्या लढ्यामध्ये सामील होणार असाल, तर या आणि वंचित बहुजन आघाडीच्या न्यायालयीन लढ्याला पाठिंबा द्या. जर तुम्हाला EVM विरोधातील लढाईत सामील व्हायचे आहे, तर या वंचितच्या आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मदत करून दाखवा.
कारण EVM आणि मतदान हा इथल्या तमाम वंचितांच्या आणि आंबेडकरवाद्यांच्या लोकशाही आणि संविधानाचा प्रश्न आहे. याशिवाय, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्यासाठी असलेल्या बजेटचा मोठा भाग ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवल्याबद्दलही सुजात आंबेडकर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “आम्ही ‘लाडकी बहीण’ योजनेच्या विरोधात नाही, परंतु भाजप सरकार इतर विभागांचा पैसा न वळवता फक्त SC, ST आणि दलितांचा निधी वळवते, हे त्यांना वंचितांचा विकास नको असल्याचे स्पष्टपणे दर्शवते.” या संदर्भात, त्यांनी संजय शिरसाठ यांच्या निधी पळवण्याच्या विधानाचा संदर्भ देत काँग्रेसवरही निशाणा साधला.
“कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने १७ कोटी ६० हजार रुपये इतका निधी धार्मिक कार्यांसाठी वळवला आहे. हे केवळ भाजपचे सरकारच नाही, तर काँग्रेस सरकारही अशाप्रकारे निधीचा गैरवापर करत आहे,” असे आंबेडकर यांनी नमूद केले. भाजप नागनाथ आहे, तर काँग्रेस सापनाथ आहे. आपल्या गळ्यावर कोणताही साप नको आहे. आपल्याला फक्त वंचितांची सत्ता हवी, आणि आपल्याला आपले न्याय, हक्क आणि अधिकार हवे आहेत.
वंचित बहुजन आघाडी ईव्हीएमच्या पारदर्शकतेसाठी आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी आपला संघर्ष सुरू ठेवेल, असेही सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, प्रा. सोमनाथ साळुंखे, डॉ. अरुण जाधव, अविनाश भोसीकर, युवा आघाडीचे अमोल लांडगे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”
गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...
Read moreDetails