नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिझर दरम्यान मृत्यू झालेल्या शीतल मोरे यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना शिक्षा व्हावी, यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि युवा आघाडीने गेल्या वर्षभरापासून पुकारलेल्या लढ्याला आता मोठे यश येताना दिसत आहे. या प्रकरणात प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून, याला अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा मोठा टप्पा मानला जात आहे.
शीतल मोरे यांच्या मृत्यूनंतर वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे यांनी संबंधित दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालून त्यांना सेवेत कायम ठेवल्याचा आरोप युवा आघाडीने केला आहे. याशिवाय, डॉ. शिंदेंवर सरकारी पैशाचा अपव्यय केल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित होऊ नये, यासाठी डॉ. शिंदेंनी मंत्री आणि आमदारांना प्रलोभने दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीने केला आहे. मात्र, पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर या प्रकरणातील सत्य समोर येत आहे.
या लढ्यादरम्यान आंदोलकांचा आवाज दाबण्यासाठी नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष रवीअण्णा पगारे यांच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच मयत शीतल मोरे यांचे भाऊ व नाशिक तालुका अध्यक्ष विकी वाकळे आणि महासचिव संतोष वाघ यांच्यावरही परिचारिका संघटनेच्या माध्यमातून खोटे आरोप करून लढ्याची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, हे सर्व अडथळे पार करून आज सत्याचा विजय होत असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
या यशावर प्रतिक्रिया देताना युवा आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, “आज एक महत्त्वाचा टप्पा गाठला असला तरी आमची लढाई थांबलेली नाही. जोपर्यंत शीतल मोरे यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या ‘मारेकऱ्यांना’ प्रत्यक्ष शिक्षा होत नाही आणि त्यांना कायदेशीररीत्या पदावरून हटवले जात नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि युवा आघाडीचा हा लढा अधिक तीव्रतेने सुरूच राहील.”





