नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर ग्रामीण तालुक्यातील नवनियुक्त कार्यकारिणीची बैठक जिल्हा अध्यक्ष अजय सहारे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा सचिव सोनियाताई वानखेडे, वैभव येवले, शुभम वाहने यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुका ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. यासाठी संपूर्ण जिल्हा परिषद सर्कलमध्ये संघटनात्मक बांधणी करून कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या वाटप करण्याचे ठरविण्यात आले.
जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांनी नवनियुक्त तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना संघटन कार्य, जबाबदाऱ्या आणि निवडणूक तयारी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी गावपातळीवर जनतेशी संपर्क साधून आघाडीची विचारधारा पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बैठकीस तालुकाध्यक्ष अमन जामगडे, कार्याध्यक्ष नागेश बोरकर, महासचिव राजेश्वर पिल्लेवान, चंद्रशेखर पाटील, अरविंद सवईतुल, विनायक घुमटकर, दर्शन बेले, राजेश वानखेडे, बंटी पानतावणे व बळीराम चक्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आगामी काळात वंचित बहुजन आघाडी नागपूर ग्रामीण तालुक्यात अधिक संघटित पद्धतीने कार्यरत राहील आणि जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.