संविधानविरोधी शक्तींसोबत युतीचा निषेध!
मुंबई : वंचित बहुजन आघाडीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आणि महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यासोबत आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने केलेल्या युतीला वंचित बहुजन आघाडीने “अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह” म्हटले आहे. या निर्णयामुळे आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या रिपब्लिकन सेनेला यापुढे वंचित बहुजन आघाडीचा कोणताही पाठिंबा राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की, गेल्या 70 वर्षांच्या राजकारणात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीने संविधानाला न मानणाऱ्या आणि आता संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरएसएस-भाजपसोबत कधीही युती केली नाही. याचे कारण देताना, वंचित बहुजन आघाडीने नमूद केले की भाजप-आरएसएस हे संतांचा हिंदू धर्म मानत नाहीत, तर सनातन वैदिक धर्म मानतात. याउलट, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ ही समता, स्वातंत्र्य, बंधुता यावर आधारित संतांच्या विचारांची पाईक आहे, असे सांगत हे दोन्ही गट दोन विरुद्ध टोकांवर असल्याचे आघाडीने अधोरेखित केले.
बैठकीत असेही स्पष्ट करण्यात आले की, आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असले तरी, त्यांची विचारसरणी आणि कृती ही संविधान बदलणाऱ्या आरएसएस-भाजपची समर्थक बनली आहे. आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीने आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनांना आणि उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मात्र, यापुढे कोणताच पाठिंबा देणार नाहीत. वंचित बहुजन आघाडीने तमाम फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील जनतेला आवाहन केले आहे की, ज्या संघटना संविधान बदलणाऱ्या भाजप-आरएसएस आणि त्यांच्या मित्रपक्षांशी समझोता करतील, त्या फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे पाईक होऊ शकत नाहीत.
त्यामुळे आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या रिपब्लिकन सेनेला यापुढे आपला विरोध कायम राहील. “आनंदराज आंबेडकर की संविधान?” या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा निर्णय संविधानाच्या बाजूने असून, फुले, शाहू, आंबेडकरी जनतेने आपला निर्णय घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या बैठकीत ऍड. प्रकाश आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष), रेखाताई ठाकूर (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष), ऍड. प्रियदर्शी तेलंग, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, अशोकभाऊ सोनोने, डॉ. अरुण सावंत, डॉ. अनिल जाधव, ऍड. अरुण जाधव, डॉ. अरुंधती शिरसाठ, अमित भुईगळ, सर्वजित बनसोडे, अविनाश भोसीकर, दिशा पिंकी शेख, फारुख अहमद, ऍड. गोविंद दळवी, प्रा. किसन चव्हाण, कुशल मेश्राम, महेश भारतीय, प्रा. नागोराव पांचाळ, डॉ. निलेश विश्वकर्मा, प्रा. हमराज उईके, प्रा. सोमनाथ साळुंखे, सविता मुंढे, प्रा. विष्णू जाधव, सिद्धार्थ मोकळे आणि जितरत्न पटाईत यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
गोवंडीतील खड्ड्यांवर वंचित महिला आघाडीचा तीव्र विरोध”खड्डे बुजवा, नाहीतर अधिकारी खड्ड्यात!”
गोवंडीतील खड्डेमय रस्त्यांवर व नाल्यांच्या दुर्दशेवर वंचित बहुजन महिला आघाडीचे तीव्र आंदोलन; महापालिकेला इशारा "खड्डे बुजवा नाहीतर अधिकाऱ्यांना खड्ड्यात घाला!"...
Read moreDetails