रायगड : वि. दा. सावरकर लिखित ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकाचा प्रयोग 27 सप्टेंबर 2025 रोजी पनवेलमधील बळवंत वासुदेव फडके सभागृहात होणार आहे. या नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधानांचा समावेश असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध दर्शविला आहे.
पुणे व मुंबईत या प्रयोगाविरोधात आंदोलन करून नाटकाचे प्रयोग बंद करण्यात आले होते. त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातही हा प्रयोग होऊ देणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
या संदर्भात रायगड जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड आणि कमिटी सदस्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. त्यांनी प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्वरित नाटकाचा प्रयोग रद्द करण्याची मागणी केली. अन्यथा, नाटक आयोजित स्थळी तीव्र आंदोलन करून प्रयोग उधळून लावू, असा इशारा आघाडीने दिला आहे.
या वेळी जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड, महासचिव अविनाश आडगळे, संतोष मुजमुले, उपाध्यक्ष कविता वाघमारे, छाया शिरसाठ, अमीना शेख, कोषाध्यक्ष चंद्रकांत नवगिरे, सतीश अहिरे, आलोक कांबळे, आशा लवांडे, तसेच कामोठे, न्यू पनवेल, खारघर, नावडे आदी विभागांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे की, छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिभूमीत बौद्धांचा अपमान करणारे प्रयोग कदापि सहन केले जाणार नाहीत.