नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता खऱ्या अर्थाने रंगत आली असून, वंचित बहुजन आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.
नागपूर महानगरपालिका निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा आज सायंकाळी ५ वाजता नागपुरातील ऐतिहासिक इंदोरा मैदान येथे पार पडणार आहे.
निवडणुकीचे समीकरण आणि ‘वंचित’चे आव्हान
महाराष्ट्रभरातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होऊ घातल्या आहेत. नागपुरात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यातील लढतीत वंचित बहुजन आघाडीने आपला स्वतंत्र अजेंडा घेऊन एन्ट्री केल्याने ही निवडणूक त्रिकोणी होण्याची शक्यता आहे. आजच्या सभेत बाळासाहेब आंबेडकर नागपूरच्या स्थानिक प्रश्नांसह राज्यातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेवर काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इंदोरा मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपुरातील विविध प्रभागांतून पक्षाचे उमेदवार आणि हजारो कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर शरसंधान?
नागपुरातील पाणी प्रश्न, रखडलेले स्थानिक विकास प्रकल्प आणि उपनगरातील रस्ते-वीज यांसारख्या समस्यांवर सुजात आंबेडकर यांनी आधीच अमरावतीत रान उठवले होते. आता नागपुरात स्वतः बाळासाहेब आंबेडकर मैदानात एन्ट्री करणार आहेत.






