मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे : महाविकास आघाडीने अकोला व्यतिरिक्त ज्या दोन जागांचा प्रस्ताव दिला आहे, तो वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एकमताने फेटाळला आहे. अकोल्याची जागा सोडण्याची तयारी आम्ही दाखवली होती, तरी आम्हाला हरणाऱ्या दोन जागा ज्या दिलेल्या आहेत. त्या आम्हाला नको असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे. ते पुण्यातील प्राईड हाॅटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मोकळे म्हणाले, मविआच्या बैठका होत आहेत, त्या बैठकांना आम्हाला बोलावत नव्हते, 2 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या दरम्यान झालेल्या कोणत्याही बैठकीत आम्हाला बोलावलं नाही. शेवटची बैठक ही 6 मार्च रोजी झाली, आज 15 मार्च आहे अद्याप कोणताही संवाद महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडून आमच्याशी झालेला नाही. या पद्धतीची वागणूक वंचित बहुजन आघाडीला दिली जात असल्याचे मोकळे यांनी म्हटले आहे.
मोकळे म्हटले की, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची भूमिका ही आहे की, आम्ही केवळ तुम्हाला मतदान देऊन तुमच्या जागा निवडून आणण्यासाठी नाही आहोत. तर आम्हाला इथल्या शोषित, पीडित आणि वंचित समूहाला राजकीय प्रतिनिधित्वाचा हक्क मिळवून द्यायचा आहे. त्यांना सभागृहात पाठवणे हे आमचे धेय्य आहे, त्यामुळे त्यांचा प्रस्ताव आम्ही नाकारत आहोत.
मविआला वंचित बहुजन आघाडीची गरज आहे, वंचितचा मतदार तुम्हाला हवा आहे, वंचितचा उमेदवार निवडणूक द्यायची तयारी त्यांनी दाखवली पाहिजे. केवळ उमेदवार नाकारायचे, आणि पडणाऱ्या जागा द्यायच्या हे धोरण बरोबर नसल्याचे मोकळे यांनी म्हटले आहे.
आम्ही इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत जाण्यासाठी कोणताही नकार देत नाही, त्यांनी दिलेला प्रस्ताव अमान्य आहे. त्यांनी सुधारित प्रस्ताव द्यावा. तसेच, वंचित बहुजन आघाडीला B टीम म्हणणारे स्वतः भाजपमध्ये गेले आहेत, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.