नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला बळ देण्यासाठी नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये पक्षाचे प्रशस्त संपर्क कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या हस्ते पार पडले.
या उद्घाटन सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भीमचंद शेठ चंद्रमोरे, शहर संघटक दीपक भंडारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडीची ताकद नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. बहुजन, वंचित, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडी नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सन्मानजनक युती शक्य झाली तर युतीत, अन्यथा स्वबळावर ताकदीने निवडणुका लढवण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला आहे.”

पक्षाचे नेते अशोक पगारे यांनी प्रभाग क्रमांक 17 मध्ये संपर्क कार्यालय सुरू करून पक्षकार्य अधिक गतिमान करण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, त्यावर पाठपुरावा करणे तसेच पक्षाच्या विचारांची प्रभावी मांडणी करणे हे प्रमुख उद्दिष्ट राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या नव्या संपर्क कार्यालयामुळे नाशिक शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, तसेच स्थानिक पातळीवरील सामाजिक, राजकीय प्रश्नांना वंचित बहुजन आघाडी अधिक प्रभावीपणे वाचा फोडू शकेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.






