मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी मुंबईच्या विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांची आणि इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात पार पडलेल्या या मुलाखतींच्या वेळी सकाळपासूनच इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह गर्दी केली होती. प्रत्येक उमेदवार आपली ताकद आणि कामाचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्यासाठी उत्सुक होता.

वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष स्नेहल सोहनी, युवा अध्यक्ष सागर गवई यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मुलाखतींमध्ये केवळ उमेदवाराची लोकप्रियता नाही, तर त्याची पक्षाप्रती निष्ठा आणि सामाजिक कार्याचा अनुभव देखील तपासला जात आहे.

यावेळी मुलाखतीला आलेल्यांमध्ये तरुणांची आणि सुशिक्षित उमेदवारांची संख्या लक्षणीय होती. “पक्षाने दिलेला ‘एक संधी वंचितला’ हा नारा आता लोकांपर्यंत पोहोचला असून, यावेळी आम्हाला संधी मिळेल,” असा विश्वास अनेक इच्छुकांनी व्यक्त केला. या गर्दीमुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद मुंबईसह संपूर्ण राज्यात वाढत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.






