परभणी : वंचित बहुजन आघाडीची परभणी जिल्ह्याची उत्तर-दक्षिण आढावा बैठक परभणी शहरातील वसमत रोड येथील सावली शासकीय विश्रामगृह येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व जिल्हा समन्वयक अशोक सोनोने होते. यावेळी भा.बौ. महासभा राज्य संघटक भीमराव तायडे, राज्य उपाध्यक्ष प्रा. नागोराव पांचाळ, प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ. सुरेश शेळके, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सुनील मगरे, जिल्हाध्यक्ष (उत्तर) तुकाराम भारती यांच्यासह महिला व युवक आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा व तालुकास्तरावर संघटन बांधणी, महिला व युवक आघाडीचे नियोजित उपक्रम तसेच सामाजिक व राजकीय प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्यासंबंधी चर्चा झाली. मार्गदर्शन करताना अशोकभाऊ सोनोने, भीमराव तायडे, प्रा. नागोराव पांचाळ व डॉ. सुरेश शेळके यांनी कार्यकर्त्यांना संघटनशक्ती वाढवून आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. बैठकीचा समारोप एकमताने “आगामी काळात वंचित बहुजन आघाडीला अधिक बळकट करण्याचा निर्धार” करून झाला.