छाया गांगुर्डे यांच्या संपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन व प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न!
नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिक शहरात प्रभाग क्रमांक १९ मध्ये तौफिक पठाण आणि छाया गांगुर्डे यांच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गोरेवाडी भागात महिला जिल्हा अध्यक्ष उर्मिला गायकवाड यांच्या हस्ते वंचित बहुजन महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
या सोहळ्याला परिसरातील नागरिक, महिला, युवा कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी ‘जयभीम, जय वंचित’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या वेळी जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे म्हणाले, “काल-परवा पासून नाशिक शहरात काही पेपर टायगर उड्या मारत आहेत. त्यांनी लोकांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही त्यांना आमच्या कृतीतूनच उत्तर दिले आहे. वंचित बहुजन आघाडी ही केवळ कागदावर नाही, तर जनतेच्या मनात आहे. आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे तत्वनिष्ठ आणि कृतिशील कार्यकर्ते आहोत,” असा जोरदार टोला त्यांनी लगावला.
गांगुर्डे पुढे म्हणाले, “आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत सन्मानाने आघाडी झाली तर उत्तम; अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू आणि महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवू. वंचित, बहुजन, अल्पसंख्याक, महिला आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हीच पर्याय आहोत.”
शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
या कार्यक्रमात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांमधील शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याला सलामी देत पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.
Akola : नगरपालिका व नगर परिषद निवडणुकीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न
या कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ भालेराव, महिला नेत्री लीना खरे, जिल्हा संघटक सागर रिपोर्टे, युवा शहर महासचिव दीपक पगारे, उपाध्यक्ष मॉंटी गायकवाड, नाना पवार, दीपक भंडारी, विलास गुंजाळ, नाना तपासे, युवराज मणेरे, राजू गोतीस, राहुल पटेकर, राहुल नेतावटे, किशोर बेंडकुळे, भारतीय बौद्ध महासभेचे सनी जाधव, सम्यक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मिहीर गजबे, धम्मगौतमी धिवरे आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्याच्या वेळी परिसरात ढोल–ताशांच्या गजरात स्वागत मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी फुलांनी सजवलेले स्वागत द्वार उभारून पाहुण्यांचे स्वागत केले. तौफिक पठाण आणि छाया गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक कार्यकर्त्यांनी नागरिकांमध्ये पक्षाचा प्रचार करत एकजूट दाखवली.
या कार्यक्रमाचे आयोजन तौफिक पठाण आणि छाया गांगुर्डे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते दीपक पगारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सागर रिपोर्टे यांनी मानले. नाशिक शहरातील वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा सोहळा ऐतिहासिक ठरला आहे. या उद्घाटनाने प्रभाग क्रमांक १९ तसेच गोरेवाडी परिसरात पक्षाची पकड आणखी मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.






