मुर्तिजापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाचा निर्धार करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्ह्यात ‘चर्चा दौरा’ सुरू केला आहे. याच दौऱ्याअंतर्गत मुर्तिजापूर येथे पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चर्चा आणि मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. निवडणूक प्रचार यंत्रणेचा प्रभावी वापर करण्यावर आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यावर या चर्चा दौऱ्यात भर देण्यात आला.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वंचित समूहांना सत्तेत स्थान मिळवून देण्यासाठीच स्थापन झाला आहे.
ते पुढे म्हणाले, ज्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत आणि पंचायत समित्यांची दारे वंचित समूहांसाठी पूर्वी बंद होती, त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने या समाजातील घटकांना थेट सत्तेत पोहोचवले. यामुळे या प्रतिनिधींच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याची एक मोठी संधी पक्षाने उपलब्ध करून दिली आहे.
प्रस्थापित व्यवस्थेचे आव्हान स्वीकारून वंचित, बहुजन आणि शोषितांना सत्तेत पोहोचवण्याची एक नवी व्यवस्था वंचित बहुजन आघाडीने निर्माण केली आहे, असे मत सुजात आंबेडकर यांनी या चर्चा दौऱ्यात व्यक्त केले.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर यांच्यासह अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.