नागपूर : वंचित बहुजन आघाडीने दीक्षाभूमी परिसरातील अपूर्ण आणि निकृष्ट कामांकडे लक्ष वेधल्यानंतर, प्रशासनाने तातडीने हालचाली करत रातोरात कामाला प्रचंड वेग दिला आहे. विशेषतः पुस्तकांचे स्टॉल लागणाऱ्या परिसरात साचलेले पाणी आणि चिखलामुळे होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
रातोरात कामाची गती वाढवली –
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री पालकमंत्री यांच्या निदर्शनास येथील गंभीर परिस्थिती आणून दिली होती. पुस्तकांचे स्टॉल असलेल्या परिसरात पाणी साचून चिखल झाल्याने भाविक आणि स्टॉलधारकांची मोठी अडचण होत होती. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.
या आदेशानंतर प्रशासनाने युद्धपातळीवर पाऊले उचलली. रातोरात या परिसरात गिट्टी चुरीचे ट्रक पोहचले. तसेच, रोडरोलर आणि इतर बांधकाम साहित्यासह मजदूरांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या दणक्यामुळे दीक्षाभूमीवरील अपूर्ण कामाला तातडीने गती मिळाली आहे.