औरंगाबाद : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामातील विलंब लक्षात घेऊन आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद येथे भेट देण्यात आली. या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कार्यकारी अभियंता यांच्यासोबत बैठक निश्चित करण्यात आली होती. मात्र ते कार्यालयात अनुपस्थित असल्याने चर्चा होऊ शकली नाही.
कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने पुतळा कामाच्या विलंबाबाबतचे निवेदन त्यांच्या कार्यालयाला चिटकवण्यात आले. त्याचबरोबर फोनद्वारे संपर्क साधून त्यांना स्पष्टपणे सूचित करण्यात आले की – येणाऱ्या १ एप्रिल 2026 पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले नाही तर वंचित बहुजन आघाडी तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकण्यात येईल
यावेळी स्थानिक आमदार व खासदारांनी जनतेसमोर केलेले विधान—
“पुतळ्याचे काम आम्ही आमच्या वैयक्तिक किंवा विकास निधीतून करत आहोत” —
हे विधान संपूर्ण खोटे असल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले. प्रत्यक्षात हा प्रकल्प नगर विकास विभागाच्या निधीतून, औरंगाबाद महानगरपालिकेच्या अंतर्गत भरकलगेट परिसरात सुरू आहे.
कार्यकारी अभियंता यांच्या गैरहजेरीमुळे निवेदन स्वीकारले गेले नसले तरी, वंचित बहुजन युवा आघाडी औरंगाबाद मध्य शहराध्यक्ष संदीप रतन जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन अधिकृत स्वरूपात कार्यालयाला देण्यात आले असून सरकारी यंत्रणेने तात्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात आली.






