औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष संदीप रतन जाधव यांनी औरंगाबाद येथील पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) यांच्याकडे एका फेसबुक पेजवर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ‘राजकारण विदर्भाचे’ नावाच्या फेसबुक पेजवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि जातीयवादी टिपण्णी असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नेमका काय आहे प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यालयावर जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला होता. या घटनेनंतर ‘राजकारण विदर्भाचे’ या फेसबुक पेजवरून एक आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच संदीप जाधव यांनी तक्रारीत केला आहे.
आक्षेपार्ह मजकूर -वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक योगेश बन यांना आलेल्या एका लिंकमध्ये हा व्हिडिओ होता. व्हिडिओमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह जातीवाचक शब्दांचा प्रयोग करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये ‘प्रकाश आंबेडकर एक्सपोज सिरीजच्या पहिल्या भागात’ असा उल्लेख केलाय. हे कृत्य मानहानीकारक असून सामाजिक सलोखा बिघडवणारे आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी-
या गंभीर प्रकाराची दखल घेत युवा शहर अध्यक्ष संदीप रतन जाधव यांनी स्वतः पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यांनी ‘राजकारण विदर्भाचे’ या फेसबुक ग्रुपचे सर्व ॲडमिन (प्रशासक) तसेच व्हिडिओशी संबंधित सर्व व्यक्तींवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम, ॲट्रॉसिटी कायद्यानुसार व इतर कायदेशीर कलमांखाली त्वरित गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली असून, या आक्षेपार्ह पोस्टमुळे समाजात कोणताही गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी केली आहे.






