जालना : जालना महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी केला आहे. जालना शहरातील माढा कॉलनी येथे दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता प्रचारादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा आरोप केला.
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अमोल विष्णु लोखंडे, सुवर्णा सतीश मुंढे, रमाताई अरविंद होर्शीळ आणि डॉ. दिपक शामराव भालेराव यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना दिपक डोके म्हणाले की, शिवसेना (शिंदे गट) चे आमदार अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराच्या आडून वंचित बहुजन आघाडीविरोधात संभ्रम पसरवला जात आहे.
भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षांच्या पत्नीला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने, दिपक डोके यांनी जाणीवपूर्वक उमेदवारी रोखली आणि नंतर स्वतःच त्या उमेदवाराला उभे केले, असा विरोधाभासी व खोटा प्रचार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या अपप्रचाराचा उद्देश फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून वंचित बहुजन आघाडीची बदनामी करणे हाच असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी प्रभाग क्रमांक १६ मधील वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार, जिल्हा संघटक राजेंद्र खरात, युवा जिल्हा उपाध्यक्ष हरीष रत्नपारखे यांच्यासह दिलीप मगर, अरविंद होर्शीळ, अनुराग होर्शीळ, रुख्मिणी लोखंडे, नयन हिवराळे, रोहित जाधव, प्रदीप हिवाळे, सतीश मुंढे, संजय आदमाने तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीविरोधातील खोट्या व दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.






