अकोला : सोशल मीडियावरून सातत्याने होणारी बदनामी आणि द्वेषपूर्ण टीका करणाऱ्या ट्रोलर्सवर (Trollers) कडक कारवाई करून त्यांना अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा व महानगर शाखेच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ११ वाजता आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमण्यास सुरुवात झाली. आंदोलकांनी ‘सोशल मीडिया ट्रोलर्सना अटक करा’ अशा आशयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करून त्यांच्याबद्दल हेतुपुरस्सर बदनामीकारक मजकूर पसरवणाऱ्यांवर सायबर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या महिलांना पोलिसांची मारहाण; रुपाली चाकणकर यांच्या विधानाविरोधात मोर्चा काढताना घटना!
या धरणे आंदोलनात ‘वंचित बहुजन युवा आघाडी’सोबतच ‘वंचित बहुजन आघाडी’, ‘वंचित बहुजन महिला आघाडी’ आणि ‘सक्यक विद्यार्थी आंदोलन’ या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर, एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले व या प्रकरणात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली.





